उल्हासनगर : भाजपाचे महापौरपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची भिस्त असलेल्या साई पक्षाने घटनेची प्रत सादर केली नसल्याने कोकण विभागीय आयुक्तांनी एक गट म्हणून या पक्षाची असलेली मान्यता रद्द केली आहे. यामुळे भाजपाला धक्का बसला असून साई पक्षात फूट पाडून आपला महापौर बसवण्याचे मनसुबे रचणाऱ्या शिवसेनेला नवी संधी प्राप्त झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी साई पक्षाला गट म्हणून दिलेली मान्यता रद्द केली असल्याला दुजोरा दिला. यामुळे साई पक्षाच्या नगरसेवकांवर पक्ष व्हिप बंधनकारक होणार नाही. परिणामी महापौर, उपमहापौर निवडणुकीत साईचे ११ नगरसेवक कोणालाही मतदान करू शकतात. साई पक्षातील लुंड गटाला गळाला लावण्यात शिवसेनेला यश आले होते. मात्र, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्या चैनानी यांच्या निवासस्थानी लुंड यांना बोलवून महापौरपदाकरिता अर्ज भरण्यापासून रोखले, त्या लुंड गटाला किंवा साई पक्षातील अन्य नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याची संधी शिवसेनेला प्राप्त झाली आहे. चव्हाण यांनी ज्या चैनानी यांच्या निवासस्थानी बस्तान ठोकले होते, त्या राजकुमार चैनानी यांनाच शिवसेनेने स्वीकृत सदस्य करून भाजपाला दणका दिला होता. आता कोकण आयुक्तांच्या आदेशामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना खेळी खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाने साई पक्षाचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन करण्याची खटपट चालवली आहे. महापौरपदासाठी भाजपाने, तर उपमहापौरपदासाठी साई पक्षाने अर्ज दाखल केले. भाजपाचे ३३, तर साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले असून सत्तेसाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेवार यांनी कोकण विभागीय आयुक्ताकडे साई पक्षाच्या गटाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती. साई पक्षाने आपली घटना कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केली नाही. त्यामुळे गटाची नोंदणी रद्द का करू नये, असे तक्रारीत म्हटले होते. विभागीय आयुक्तांनी हा आक्षेप ग्राह्य धरून साई पक्षाच्या गटाची नोंदणी रद्द केली, अशी माहिती तक्रारदारांनी दिली. (प्रतिनिधी)
कोकण आयुक्तांकडून साई पक्ष गटाची मान्यता रद्द
By admin | Published: April 01, 2017 11:41 PM