भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील इंद्रलोक परिसरातील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान आयोजित एका खाजगी कार्यक्रमापोटी प्रभाग अधिकारी प्रकाश कुळकर्णी यांनी नियमानुसार अनामत रकमेच्या वसुलीला बगल दिली. केवळ भाडेच वसूल केल्याचा आक्षेपार्ह कारभार केला आहे. तसेच या प्रशासनाकडून अलीकडेच लावण्यात आलेले लॉन (गवत) कार्यक्रमाच्या मंडपासाठी उखडल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी प्रशासनाने त्या अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.शहरातील भव्य मैदानांपैकी एक असलेल्या मैदानात मीरा रोड परिसरातील बहुतांशी खेळाडू क्रिकेट, फुटबॉल खेळण्यासाठी येत असतात. या मैदानांत रविवारचा दिवस फुल्ल ठरत असतानाही या मैदानातील सुमारे १५० फूट रुंद ते ५०० फूट लांब जागा एका खाजगी कार्यक्रमाला २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्षात ६ डिसेंबरपासून सुरू होणार असला तरी २८ नोव्हेंबरपासून मैदानात भव्य मंडपाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याने मुलांना खेळण्यासाठी जेमतेम जागा शिल्लक राहते. अशातच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पालिकेकडून मंडपाच्या आकारमानानुसार अनामत रक्कम वसूल करणे अनिवार्य असून त्यानुसारच भाडेदेखील ठरवले जाते. परंतु, या कार्यक्रमासाठी प्रभाग अधिकारी कुळकर्णी यांनी कार्यक्रम आयोजकांकडून अनामत रक्कमच वसूल केली नसल्याचे समोर आले आहे. तसेच १९ दिवसांचे केवळ २१ हजार भाडे आकारण्यात आल्याने या गैरकारभारप्रकरणी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी त्या अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या मैदानात अलीकडेच नव्याने लावण्यात आलेले लॉनदेखील मंडपाच्या बांधकामामुळे उखडले गेल्याने त्याच्या नुकसानीस त्या अधिकाºयालाच जबाबदार धरण्यात आले आहे. याखेरीज, येथे साहित्यविक्रीचे स्टॉल्स लावणार असल्याने आयोजकांकडून पालिकेने अतिरिक्त वाणिज्यिक दराने भाडे वसूल करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. खाजगी मैदानांच्या आयोजनासाठी अनेकदा राजकीय दबावतंत्राचा वापर होत असल्याने प्रशासनही हतबल ठरत असल्याचे दिसले आहे.
अनामत रक्कम न घेता केवळ भाडेच स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:58 AM