ठाणे : अभिनेते भरत जाधव यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील दुरवस्थेवर शनिवारी फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून केलेल्या टीकेचे समर्थन करून सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनासमोर या नाट्यगृहातील समस्यांचा पाढा वाचला. ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या कार्यालयातील एसी बंद करून या नाट्यगृहातील असुविधांवर चर्चा केली. तसेच, नाट्यगृहातील संबंधित अधिकाºयाला निलंबित करण्याचीदेखील मागणी केली. या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही पालिका प्रशासनाने यावेळी दिली.
भरत जाधव यांच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान एसी बंद पडल्याने त्यांनी फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून घाणेकर नाट्यगृहातील दुरवस्थेवर टीका करून हा प्रकार दोन ते तीन वेळा माझ्यासोबत घडला असल्याचे सांगितले. या व्हिडीओची दखल घेऊन मनसेचे जाधव यांनी पदाधिकाऱ्यांसह उन्हाळे यांची भेट घेतली. यावेळी पालिका उपायुक्त संदीप माळवीदेखील उपस्थित होते. पालिका हँडवॉशसारख्या नको त्या गोष्टींवर करोडो खर्च करते. देखभाल- दुरुस्तीचा पैसा कोण खाते, असा सवाल करून नाट्यगृहात तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरुपी तोडगा काढा. घाणेकरमध्ये कोणती ना कोणती समस्या उद्भवतच असते. सातत्याने अशी घटना जेव्हा घडते तेव्हा ते ठाणे महापालिकेचे अपयश आहे, अशी टीका मनसे पदाधिकाºयांनी केली.याप्रसंगी पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ठाण्याची लाज महाराष्ट्राच्या वेशीवरभरत जाधव यांनी या व्हीडीओच्या माध्यमातून संपूर्ण ठाण्याची लाज महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली आणि एक ठाणेकर म्हणून मला स्वत:ला अपमान वाटला म्हणून पालिका आयुक्तांना भेटायला आलो असल्याचे जाधव यावेळी म्हणाले. साडेतीन हजार कोटींचे बजेट असलेली महापालिका सुसज्ज नाट्यगृह ठाणेकर कलाप्रेमींना देऊ शकत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे, येत्या आठ - दहा दिवसांत घाणेकर नाट्यगृहातील समस्या सुटल्या नाहीत तर मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी मनसेने दिला.