भिवंडी- पुलाचा कठडा तोडून भरधाव वेगाने जाणारा आयशर कंटेनर चालकासह खाडीत बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी - ठाणे महामार्गावर असणाऱ्या खारेगांव पुलावर सोमवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे खाडीच्या पाण्यात पडलेला कंटेनर चालकासह कशेळी पुलापर्यंत खाडीला आलेल्या भरतीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. मात्र सुदैवाने कंटेनर चालकाला स्थानी मच्छिमारांनी वाहत्या कंटेनर व पाण्यातून बाहेर काढले असल्याने त्याचा जीव वाचला आहे. रमेश पंडित यादव (47 रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या कंटेनर चालकाचं नाव आहे.
कंटेनर चालक रमेश हा इंदौर येथून मुंबईच्या दिशेने कंटेनर (एमएच- 04-एचवाय 8691) हा कंटेनर भिवंडीहून न्हावाशेवा बंदर येथे परदेशातून आलेला माल घेऊन येण्यासाठी आज सकाळच्या सुमाराला जात होता. त्यावेळी त्याला अचानक झोप लागल्याने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरवरून चालकाचा खारेगांव पुलावर अचानक ताबा सुटला आणि पुलाचा कठडा तोडून चालक रमेश हा कंटेनरसह खाडीत पडला. कंटेनर थेट खारेगाव टोलनाक्याजवळ असणाऱ्या खाडीत पडल्याने अपघात झाल्याचे पाहताच कंटेनर चालक रमेशला कशेळी पुलालगत मच्छीमारी करीत असलेल्या मच्छीमार व पुलाखाली काही ट्रक चालक विश्रांतीसाठी बसले होते. त्यांनी पाण्यात उड्या घेत त्याला वाचविले आहे. अपघातात जखमी झालेल्या चालक रमेशला ठाणे, राबोडी येथील परम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस आणि ठाणे व भिवंडीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन खाडीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या कंटेनरला स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.