कसारा - कल्याणहून नाशिककडे जाणाऱ्या एका गाडीला गुरुवारी कसारा घाटात झालेल्या अपघातात आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. या अपघातात गाडीतील सहा जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला. कल्याणहून नाशिककडे कसारा घाटातून जात असताना एक कार धोकादायक वळणाच्या उजव्या बाजूच्या २५ ते ३० फूट खोल नाल्यात कोसळली. घाटातील दाट धुके आणि नागमोडी वळणाचा चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाला. यात गाडीतील हर्षवर्धन पद्माकर पवार या चिमुरड्याचा मृत्यू झाला. बाळाची आई सुनीता पद्माकर पवार यांच्यासह पुष्पा पवार, अनिरुद्ध जाधव, शंकर पवार, नचिकेत पवार आणि अन्य एक जण या अपघातात जखमी झाला. जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालय सूत्रांनी दिली.काचा फोडून बचावकार्यअपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करणाºया पिंक इन्फ्राचे रूट पेट्रोलिंग अधिकारी रवी देहाडे, आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे सदस्य दत्ता वातडे आणि अन्य सदस्यांनी कारच्या काचा फोडून अडकलेल्यांना बाहेर काढले. मात्र, दाट धुके आणि सतत कोसळणाºया पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले.संरक्षक कठडे असते तर...घाटात ज्याठिकाणी अपघात झाला, त्या नागमोडी वळणावर डाव्या बाजूस ३०० ते ५०० फूट खोल दरी आहे, तर उजव्या बाजूस २५ ते ३० फूट नालासदृश दरी आहे. या नाल्याच्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पिंक इन्फ्रा कंपनीने संरक्षक कठडे वेळीच बांधले असते, तर ही वेळ आली नसती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी मदतकार्य सुरू केले. त्यामुळे जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा पुरविणे शक्य झाले.
कसारा येथे अपघात, बाळाचा मृत्यू, सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:06 AM