अंबरनाथ : अंबरनाथमध्ये सोसायटीच्या रस्त्यावर डंपर अडकून सोमवारी उलटला. पूर्वेच्या शिवालिकनगर परिसरात हा प्रकार घडला.
शिवलिकनगर गृहसंकुलात १०४ सदनिका असून, या संकुलाच्या मुख्य रस्त्यात बिल्डरने बांधकाम सुरू केल्यामुळे बाजूने एक अरुंद रस्ता सोसायटीला देण्यात आला आहे. मात्र हा रस्ता कच्चा असून, डंपर किंवा अग्निशमन दलाची गाडी येईल इतकाही रुंद नाही. याच रस्त्याच्या कामासाठी साहित्य घेऊन आलेला एक डंपर सोमवारी सकाळी सोसायटीच्या दिशेने वर चढत असताना अर्ध्या रस्त्यातच मातीत रुतला आणि डंपरची दोन चाके हवेत गेली. त्यामुळे अर्धवट झालेल्या बांधकामावर हा डंपर कोसळतो की काय, अशी भीती निर्माण झाली. मात्र यावेळी शक्कल लढवत डंपर जागीच रिकामा करण्यात आला. मात्र तरीही संध्याकाळपर्यंत डंपर मातीतच रुतलेला होता. तो काढण्यासाठी क्रेनही आणणे शक्य नव्हते. या अरुंद रस्त्यावर डंपरही येऊ शकत नसेल, तर फायर ब्रिगेड कशी येणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.