डोंबिवली: रेल्वे रुळ ओलांडून लघूशंकेला गेलेल्या निखिल तेजपाल (४०) रा. जोशीबाग, कल्याण या युवकाला मुंबई दिशेकडील एका लोकलचा धक्का लागल्याची घटना कोपर स्थानकात सोमवारी रात्री घडली. त्यात तो जखमी झाला असून त्यास उपचारार्थ डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.डहाणू-पनवेल या डेमू गाडीने तो सोमवारी रात्री ७.५०च्या सुमारास कोपर येथे उतरला. तेथून तो कल्याणला जाण्यासाठी खालील बाजूला असलेल्या कोपर स्थानकात आला. मात्र, कल्याणला जाणा-या गाडीला काही अवधी असल्याने त्यावेळेत लघवी करण्यासाठी तो रुळ ओलांडून गेला. तेथून परतत असतांना मुंबईकडे जाणा-या लोकलचा त्यास धक्का लागला, त्यात तो जखमी झाल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि म्हात्रेनगरचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी दिली. त्या धडकेत जखमी झालेल्या निखिलला पेडणेकरांसह काहींनी डोंबिवली स्थानकातील फलाट १वरील रेल्वे अपघात आरोग्य कक्षात आणले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपाचर करुन त्यास एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आल्याचे पेडणेकर म्हणाले. रुळ ओलांडत असतांना लोकलच्या धडकेने हा अपघात झाला असल्याच्या वृत्ताला डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी हरिदास डोळे यांनीही दुजोरा दिला.कोपर स्थानकात संरक्षक भिंत बांधण्यात यावी, तसेच दिवा-वसई मार्गावरील कोपर स्थानकात स्वच्छतागृह बांधावे, तसेच तेथिल पादचारी पूल अरुंद असून तो रुंद करावा. त्या ठिकाणी ४८ पाय-या असून त्या चढता-उतरतांना प्रवाशांची दमछाक होते. त्यासाठीही प्रभावी तोडगा काढावा अशा आशयाची निवेदन देण्यात आली आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह सुरक्षा विभाग, डोंबिवली-कोपरचे स्थानक प्रबंधक आदींकडे सातत्याने दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्या पत्रांना, सूचनांकडे कानाडोळा होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांचे जीवघेणे अपघात वाढत असून याची रेल्वे प्रशासनाने गांभिर्याने दखल घ्यावी असेही ते म्हणाले.-------------
रुळ ओलांडतांना कोपर स्थानकात अपघात : कल्याणचा प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:24 PM
रेल्वे रुळ ओलांडून लघूशंकेला गेलेल्या निखिल तेजपाल (४०) रा. जोशीबाग, कल्याण या युवकाला मुंबई दिशेकडील एका लोकलचा धक्का लागल्याची घटना कोपर स्थानकात सोमवारी रात्री घडली.
ठळक मुद्दे सोमवार रात्रीची घटना* जखमीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू