ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गाच्या नाशिक वाहिनीवरील उड्डाणपुलावर झालेल्या तीन वाहनांमधील विचित्र अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रिक्षातील दोघे प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
पहाटे १ वाजण्याच्या सुमारास विजय गायकवाड हा चालक टाटा ट्रेलर घेऊन निघाला होता. त्याच्या मागून अहतेशाम सय्यद हा रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी त्यांच्या मागून राजेश मिश्रा हा टाटा ट्रेलरचालक ट्रेलर घेऊन एकामागून एक मुंबई नाशिक महामार्गाच्या नाशिक वाहिनीवरून जात होते. ही वाहने माजीवडा उड्डाणपुलावर आलेल्या एकमेकांवर एकामागून एक अशी धडकली. यामध्ये रिक्षातून प्रवास करणारे दोघे जखमी झाले असून दानिश याच्या दोन्ही पायांना आणि डोक्याला तर तरनुमून या महिलेच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, कापूरबावडी पोलीस आणि वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य हाती घेतले होते. तसेच अपघातग्रस्त दोन्ही वाहने हायड्रा क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याप्रकरणी पुढील कार्यवाही पोलीस विभागामार्फत सुरू आहे.