ठाणे : घोडबंदर भागात गायमुख चढणीवर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने वाहन चालकांना वाहतुक कोंडीची सामना करावा लागत असतांनाच बुधवारी मुंबई नाशिक महामार्गावर मुंबई आणि नाशिकच्या दिशेने तब्बल चार तासाहून अधिक काळ वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात बुधवारी सकाळी कंटेनर चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर थेट दुसऱ्या मार्गावरून जाणाºया डम्परवर धडकला. त्यामुळे महामार्गावर दोनही बाजूस वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. दुपारी दोन नंतर वाहतुक सेवा पुर्वपदावर आल्याचे दिसून आले.
मुंबई नाशिक महामार्गावरून नाशिक येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारा कंटेनर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास खारेगाव टोलनाका परिसरात आला. कंटेनर चालकाला डुलकी लागली आणि तो कंटेनर दुसऱ्या मार्गावरील एका डम्परवर जाऊन धडकला. या अपघातामुळे मोठी वाहतुक कोंडी झाली. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या.वाहतुक कोंडीमुळे सकाळी कामावर जाणाºया चाकरमान्यांना त्याचा नाहक फटका सहन करावा लागला. दरम्यान कंटेनर हलवितांना देखील वाहतुक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागल्याचे दिसून आले. अपघात झाल्यानंतर कंटेनरचे ब्रेक जाम झाले होते. स्टेअरींग देखील अडकले होते. शिवाय गिअर देखील काम करीत नव्हते. त्यामुळे कंटेनर हटविण्यासाठी अधिकचा काळ खर्ची झाल्याचे दिसून आले.
त्यात कंटेनरमध्ये सुमारे २५ ते ३० टन वजनाचे सामान होते. दुपारी एक वाजता हायड्रा आणि क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजुला करण्यात आला. त्यानंतरही वाहतुक कोंडी कायम होती. खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनी आणि खारेगाव टोलनाका ते माणकोली पर्यंत कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांचे हाल झाले. ठाणे शहरातील माजिवडा, कापूरबावडी भागातही वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन ठाणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाºया वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.
अपघात झाल्याने या भागात वाहतुक कोंडी झाली होती. परंतु दुपारी १ वाजताच्या सुमारास कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर हळूहळू वाहतुक पूर्वपदावर आली. दुपारी दोन नंतर वाहतुक सुरळीत झाली होती.
(डॉ. विनय कुमार राठोड - पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा)