मुंबई : मालाड (पूर्व) येथील तानाजीनगर परिसरातील रिक्षाचालक संजय धूमक यांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ते कोरोनाकाळापासून रुग्णसेवा करत आहेत. त्यांचा नुकताच एक अपघात झाला़ त्यामध्ये त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना वर्षभर रिक्षा चालवता येणार नाही. रिक्षा बंद असल्याने संसाराचा गाडा हाकायचा कसा, असा सवाल सवाल धूमक विचारत आहेत.धूमक यांच्या घरी आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. ते एका ठिकाणी काम करत होते, पण त्या ठिकाणी वेळेवर पगार मिळत नव्हता. म्हणून त्यांनी कर्ज काढून रिक्षा घेतली. रिक्षावर त्यांचे घर चालते. परंतु कोरोनाकाळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा चालवली. यामध्ये चार कोरोना रुग्णांनाही त्यांनी रुग्णालयात पोहोचवले होते. एका रुग्णाला नानावटी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचाअपघात झाला, त्यामध्ये त्यांच्या हाताची नस कापली गेली. त्यांच्यावर सुराणा हॉस्पिटल मालाड (वेस्ट) येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाचा खर्च करण्यासाठी त्यांना मित्रांनी मदत केली आहे, पण त्यांना वर्षभर विश्रांती घ्यावी लागणार आहे. परिवाराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असून त्यांच्या पुढे संकट निर्माण झाले आहे. संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा त्यांना प्रश्न पडला आहे.अपघातात डाव्या हाताची नस कापली गेली, त्यामुळे बरे होईपर्यंत रिक्षा चालवता येणार नाही. रिक्षा चालवली तर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. रिक्षावर दीड लाखाचे कर्ज बाकी आहे, दैनंदिन घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न आहे.- संजय धूमक,रिक्षाचालक
रुग्णसेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा अपघात, रिक्षाशिवाय संसाराचा गाडा हाकायचा कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 3:29 AM