ठाणे : ठाण्यातून बोरिवलीकडे जाणाऱ्या एसटीचे पुढचे चाक पंक्चर झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे बसची उड्डाणपुलाला धडक बसल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.
मुंबई-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावरील विवियाना मॉलसमोर असलेल्या कॅडबरी उड्डाणपुलावरून ही बस दुपारी २.३० वाजताच्या सुमारास बोरिवलीकडे जात होती. तेव्हा अचानक तिचे पुढील चाक पंक्चर झाल्याने चालकाचे या बसवरील नियंत्रण सुटले. यात ती उड्डाणपुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. बसच्या मागे असलेल्या एका कारचे तसेच या बसचे काही प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.