- अजित मांडके ठाणे : ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील नितीन कंपनी ब्रिजजवळ ३ टन प्लास्टिक मटेरियल घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ही घटना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली. या घटनेमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वाहतूक कोंडी झाली होती. तो रस्ता टेम्पो रस्त्याच्या बाजूला केल्यावर सर्व वाहनांसाठी मोकळा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
मयूर अभंग यांच्या मालकीच्या टेम्पोमध्ये ३ टन प्लास्टिक मटेरियल घेऊन भिवंडीतुन गोरेगांव येथे त्यांचा चालक बालाजी मंदे हे निघाले होते. ते टेम्पो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर आल्यावर त्यांचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो नितीन कंपनी ब्रिजजवळ उलटला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती मिळताच, घटनास्थळी शहर वाहतूक विभागाचे पोलीस व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी तातडीने कोंडी सोडविण्यासाठी उलटलेला टेम्पो रोडच्या बाजुला करण्याचे काम सुरु केले. अखेर १ हायड्रा मशीनच्या साह्याने तो टेम्पो रस्त्याच्या बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.