डोंबिवली - मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी (17 फेब्रुवारी) सकाळी एका लोकलच्या मोटरमनने सिग्नल तोडल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी रेल्वे फाटकादरम्यान तैनात असलेल्या आरपीएफ जवानांसह अन्य सुरक्षा रक्षकांपैकी एकाने फाटक उघडे असतानाही मोटरमन लोकल पुढे आणत असल्याने तगादा केला. तसेच मोटरमनना यासंदर्भात अशी लोकल पुढे न आणण्याचे आवाहन केले. या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी अपघात होता होता टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शनिवारी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास ठाकुर्ली स्थानकादरम्यान अप जलदमार्गे येणारी एक लोकल संथगतीने रेल्वे फाटकाच्या दिशेने आली. पण त्यादरम्यान फाटक उघडे होते, दुचाकी वाहने पूर्व-पश्चिम ये-जा करत होती. त्याच वेळेत एक लोकल आली आणि सिग्नल असतानाही ती लोकल मंद गतीने पुढे आली. त्यामुळे गोंधळलेल्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ आरडाओरडा करत लोकलच्या मोटरमनकडे धाव घेत त्रागा केला. त्यावर दोघांमध्ये काही काळ शाब्दिक तणाव झाला, मात्र सुदैवानं दुर्घटना घडली नाही.
यासंदर्भात डोंबिवली आरपीएफ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-यांनाही एका पोलीस अधिका-याने माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पण यासंदर्भात मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाला माहिती देण्यात येते, ते काम स्थानक प्रबंधक कार्यालयामार्फत केले जात असल्याचेही सांगण्यात आले. पण तेथून मात्र या घटनेसंदर्भात माहिती वरिष्ठांना दिली आहे की नाही हे मात्र समजू शकले नाही.