ठाणे:ठाण्याच्या वसंतविहार परिसरातील एका जीमच्या वातानुकूल यंत्राची दुरुस्ती करतांना झालेल्या स्फोटामध्ये सागिर अन्सारी (२२, रा. कुर्ला) या तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु झाल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.वसंतविहार परिसरातील नविन म्हाडा वसाहतीमधील एका खासगी जीमच्या (व्यायाम शाळेचे) वातानुकूल यंत्र दुरुस्ती करणा-या सागिरचा या तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात अवनिश मौर्या, गोलू चौधरी आणि अंकित सिंग हे अन्य तीन कामगारही किरकोळ जखमी झाले होते. ‘सिद्धांचल क्लब’च्या जवळ असलेल्या नविन म्हाडा वसाहतीमध्ये अजित जाधव यांच्या जीममधील वातानुकूल यंत्रामध्ये (एसी) बिघाड झाला होता. एसीच्या दुरुस्तीचा ठेका असलेल्या रुडोल्फ टींगल यांनी सागीरसह चार अकुशल कर्मचा-यांना मंगळवारी दुरुस्तीसाठी पाठविल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळले. या कामगारांकडे सुरक्षिततेची कोणतीही साधने देण्यात आलेली नव्हती. चौघांपैकी सागीर अन्सारी हा वातानुकूल यंत्राच्या कॉप्रेसरमध्ये नायट्रोजन गॅस भरणा करीत असतांनाच गॅसचा दाब वाढला. त्यातूनच यंत्रामध्ये स्फोट झाल्याने तो पहिल्या मजल्यावरील खिडकीतूनच खाली फेकला गेला. खाली कोसळल्यामुळे डोक्यावर आपटल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. एसी दुरुस्तीच्या या सर्व कामामध्ये हयगय आणि अविचाराने कामगारांना काम करण्यास भाग पडायला लावणे, एकाच्या मृत्युस आणि उर्वरित तिघेजण जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार रुडोल्फ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात नादुरुस्त एसीच्या कॉम्पे्रसरमध्ये स्फोट: तंत्रज्ञाच्या मृत्युप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 7:41 PM
ठाण्यात मंगळवारी एका जीमचा एसी दुरुस्त करतांना कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या स्फोटामुळे एकाचा मृत्यु तर अन्य तिघे कामगार जखमी झाल्याची घटना घडली. यात हलगर्जीपणा करणा-या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देजीममधील एसीमध्ये झाला होता बिघाडकुशल ऐवजी अकुशल कामगारांना दिले कामसुरक्षिततेची साधने न वापरल्याचा ठपका