जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे- घोडबंदर वाहिनीवर वर्सोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर करपे कंपाऊंड जुना टोल नाका येथे मेट्रोच्या कामाचे सिमेंटचे गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला रविवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. त्यामुळे पिलरसह हा ट्रेलर रस्त्यावर आडवा झाला होता. त्याला दुसऱ्या पुलरच्या मदतीने बाजूला घेण्यात आले. तोपर्यंत ठाणे ते घाेडबंदर मार्गावर तब्बल सहा तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चालकांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, भल्या पहाटे ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शथीर्चे प्रयत्न केल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.
घोडबंदर वाहिनीवर वर्सोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर करपे कम्पाउंड जुना टोल नाका येथे मेट्रोच्या कामाचे सिमेंटचे गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाचे पहाटे पावणेतीनच्या सुमारास नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रेलर रस्त्यावरच गर्डरसह आडवा झाला. या ट्रेलरची आणि गर्डरची लांबी मोठी असल्यामुळे संपूर्ण रस्ताच बंद पडला. त्यामुळे ठाणे ते घाेडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक बंद पडली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कासारवडवली, कापूरबावडी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या पुलरची मदत घेतली. त्याच पुलरच्या मदतीने हा ट्रेलर बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाणे ते घाेडबंदर आणि घाेडबंदर ते ठाणे अशी दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती. मात्र सर्वाधिक फटका ठाणे ते घाेडबंदर मागार्ला बसला. बॅक लॉक वाढल्यामुळे साधारण तीन तासांनी म्हणजे पहाटे पावणेसहाच्या सुमारास हा ट्रेलर बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
गायमुखजवळही ट्रक बंद पडलागायमुखजवळ एक ट्रक सकाळी सव्वासतच्या सुमारास बंद पडला होता. या ट्रकमधील चालक आणि क्लिनर चक्क झोपले होते. त्यांना उठवून हा ट्रक पुढे नेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पाेलिसांनी सुरळीत केली. ओवळा, कासारवडवली आणि आनंदनगर भागात घोडबंदरकडे जाणारी वाहतूक सकाळी साडेआठ नंतर हळूहळू सुरळीत झाली. त्यानंतर नीरा केंद्र,गायमुख घाटातही ठाणे ते घोडबंदर रोडवर कोंडी झाली होती. काशिमिराच्या हद्दीमध्ये वाहतूक थांबवून ठाणे- घोडबंदर वाहिनीवर जाणारी आणि येणारी वाहिनी दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सकाळी ७ ते ९ या दरम्यान करण्यात आले. त्याचवेळी गायमुख घाटात ठाणे घोडबंदर वाहिनीवर रस्ता दुरुस्तीचेही काम सुरु हाेते. त्यामुळेही वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडली.