डोंबिवली : मध्य रेल्वेवरील अपघातांची संख्या कमी झाली असली तरीही जेथे रेल्वे फाटक आहे, क्रॉसिंग करण्याची संधी आहे अशा सर्व ठिकाणी अपघातांचे प्रमाण अद्यापही लक्षणिय आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यानच्या गेटसह क्रॉसिंगमुळे वर्षभरात ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अन्य १९ जखमी झाले आहेत. प्रामुख्याने गेट वगळता कल्याण दिशेकडील पूर्वेकडून होणारे अवैध क्रॉसिंगचे प्रमाण अधिक असल्याचे अपघातांचा धांडोळा घेतला असता निदर्शनास आले. ते होऊ नयेत यासाठी कल्याण दिशेकडे एमआरव्हीसी (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन)च्या माध्यमातून पादचारी पूल बांधण्यात येत आहे. तसेच पश्चिमेकडे फलाट बांधणे सुरू असले तरी ही कामे अत्यंत संथ सुरु असल्याचा संताप प्रवाशांमध्ये आहे.रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी मुंबई दिशेकडे एक अरुंद पादचारी पूल आहे, त्यालगतच एक फाटक आहे. मात्र गेल्या काही वर्षात ठाकूर्लीचा विस्तार हा कल्याण दिशेकडे रेल्वे समांतर रस्त्याकडे झपाट्याने होत आहे. तेथे मोठया प्रमाणावर नागरिकरण होत असून पत्रीपूलापर्यंत नागरिक वास्तव्याला आहेत. त्या सर्वांना ठाकूर्ली स्थानक सोयीचे पडते. असे असले तरीही घाई-गर्दीच्या वेळेत चाकरमान्यांना नाकी नऊ येतात. अशा धावपळीत वळसा घालून फाटकापर्यंत जाण्यापेक्षा अर्धा किमी वाचवत जीव धोक्यात घालत ट्रॅकमधून मार्ग काढण्याचा धोका शेकडो प्रवासी पत्करतात. त्या नादातच वरील अपघात घडले आहेत.
३६ प्रवाशांचा अपघाती मृत्यू
By admin | Published: December 25, 2015 2:17 AM