ठाणे: सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास उत्तर सिक्कीममधील लाचुंग- चुंगथांग राष्ट्रीय महामार्गावरील खिडूम येथे घडली. मृतांमध्ये पुनमिया कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. या घटनेने ठाण्यातील टेंभीनाका येथे शोककळा पसरली आहे.
ठाण्यातील सुमारे १८ जणांचा एक गट तीन दिवसांपूर्वी पर्यटनासाठी सिक्कीम येथे गेला होता. यात सुरेश पुनमिया(४०), त्यांची पत्नी तोरण (३७), मुलगी हिरल (१५) आणि देवांशी (१०) यांचाही समावेश होता. २८ मे रोजी (शनिवारी) रात्री जेवण केल्यानंतर ते मोटारीने निवासाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये परतत होते. त्याचवेळी नॉर्थ सिक्कीम येथे खिडूमजवळ त्यांच्या मोटारीला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये त्यांची मोटार ५०० ते ६०० फूट खोल दरीमध्ये कोसळली. या मोटारीतील चालक एस विश्वकर्मा याच्यासह पुनमिया कुटूंबातील सुरेश आणि तोरण हे दाम्पत्य, हिरल आणि देवांशी या दोन मुली तसेच सुरेश याच्या मित्राचा मुलगा जयंत परमार (१४), अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघाता वेळी तीन मोटारी या हॉटेलच्या दिशेने परतत होत्या. यादरम्यान तीनपैकी दोन वाहने हॉटेलवर पोहचली. मात्र, सुरेश पुनमिया यांची मोटार न परतल्याने त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो नॉटरिचेबल होता. अखेर याबाबत लष्कराला माहिती देण्यात आली. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टर तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले. त्यानंतर रविवारी सकाळी हा अपघाताचा प्रकार उघड झाला. अपघातात सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदनही केले आहे. अपघातग्रस्त वाहनाचा चालक हा सिक्कीमचा स्थानिक रहिवाशी होता. सोमवारी सकाळी विमानाने या सर्व पाच जणांचे मृतदेह मुंबईत आणले जाणार आहेत. तिथून तें ठाण्यात आणले जातील. सुरेश पुनमिया हे सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी असून ते टेंभी नाक्याजवळील ओशो महावीर या इमारतीमध्ये वास्तव्याला होते. त्यांच्यासह कुंटूंबाच्या अपघाती मृत्यूची वार्ता ठाण्यात दुपारी समजल्यानंतर टेंभी नाका परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
या पथकाने केले शोधकार्य-अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिक्कीमच्या चुंगथंग येथील उपविभागीय पोलीस अधिकारी एल. बी. चौधरी, निरीक्षक लाचुंग लाचुंगप्पा, तसेच काही स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बेपत्ता स्थानिक चालकासह बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा शोध घेण्यात आला. अखेर या सर्व मृतदेहांचा शोध घेण्यात या चमूला यश आले.