ठाणे : दिवा-निळजे रेल्वेमार्गावर एकवीसवर्षीय तरुण आणि सोळावर्षीय मुलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्या दोघांचे मृतदेह निळजे रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर सापडले असून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज प्राथमिक तपासात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वर्तवला आहे. या अपघातानंतर तरुणाचा मृतदेह गुरुवारी रात्री मिळून आला. तर, त्या परिसरात अंधार असल्याने युवतीचा मृतदेह शुक्रवारी पहाटे निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली.रोहिदास वाघे (२१) आणि गौरी यादव (१६) अशी दोघांची नावे असून ते डायघर परिसरातील वाकळण गावात राहणारे आहेत. रोहिदास हा एका कंपनीत माळीकाम करत होता. तर, गौरी नववीत शिक्षण घेत होती. गुरुवारी रात्री निळजे रेल्वेस्थानक प्रबंधकांनी अपघात झाल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना दिली. याचदरम्यान, रोहिदास याचा मृतदेह मिळून आला होता. त्याच्याकडील मोबाइल फोनमुळे त्याची ओळखही रात्रीच पटली होती. तसेच अपघाताच्या वेळी रोहिदासने हेडफोन लावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, शुक्रवारी पहाटे निळजे स्थानकाच्या काही अंतरावर एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर, काही तासांतच तिची ओळख पुढे आली. तसेच ती रात्री दुकानातून कानातील डूल आणण्यासाठी जात असल्याचे आईला सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरा मुलगी परत न आल्याने तिच्या पालकांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नसल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.दरम्यान, प्राथमिक तपासात दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे अजूनही कारण समजू शकले नाही. तसेच ज्या परिसरात अपघात झाला, तेथे रात्री अंधार असल्याने तिचा मृतदेह मिळून आला नव्हता. तो सकाळी निदर्शनास आला असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी दिली.
दिवा-निळजे रेल्वेमार्गावर तरुण-तरुणीचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 7:43 PM