भार्इंदर - भार्इंदर पुर्वेच्या महात्मा जोतिबा फुले मार्गावरील केबीन नाका येथे ६ मे रोजी पहाटे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार अमर नंदकुमार बागुल (२९) याचे मंगळवारी निधन झाले. ६ महिन्यांपूर्वी त्याचे वडिल वारले होते. त्याची पत्नी ३ महिन्यांची गर्भवती असून, या दुर्घटनेने बागुल कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.अमर मुळचा विक्रमगडचा असून, त्याचे मामा भार्इंदरच्या जेसलपार्क भागात राहतात. तो कुटुंबियांसोबत दोन महिन्यांआधीच इंद्रलोक फेस ३ भागात राहायला आला होता. तो लग्न आदी इव्हेंटमध्ये व्हिडिओ शुटिंगचे काम करायचा. ६ मे रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास तो मित्रासह स्कुटीने फुले मार्गावरुन जात होता. त्यावेळी केबीन नाका येथे स्कुटी घसरुन तो खाली पडला.गंभीर जखमी अवस्थेत त्याला आधी नजिकच्या साईकृपा रुग्णालयात नेले असता, तेथे दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्याला तुंगा रुग्णालयात नेले. मंगळवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुंगा रुग्णालयात दाखल करतेवेळी त्याच्या कुटुंबियांकडून एक लाख रुपये घेण्यात आले. एकूण उपचाराचा खर्च अडिच लाख रुपये झाला असून, त्यापैकी दोन लाख रुपये भरल्याचे निकवर्तियांनी सांगितले.अपघात घडला, त्यावेळी एका टेम्पोला धडक दिल्याने अमर बागुल याच्या डोक्याला जबर मार लागून, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला, असे सूत्रांनी सांगीतले. परंतु पोलिसांनी त्यास दुजोरा दिला नाही. नवघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
भाईंदर येथे तरुणाचा अपघाती मृत्यू, ६ महिन्यांपूर्वी वडीलही गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:18 AM