मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचे अपघात सत्र सुरूच आहे. गुरुवारी डोंगरी - उत्तन मार्गावर एका कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने झाडाला जोरदार धडक मारल्याने झाड कोसळले. तर चालक हा मद्यपान करून होता असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मीरा भाईंदर महापालिकेने कचरा सफाई व वाहतुकीसाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला ठेका दिला आहे. सदर ठेक्याची मुदत कधीच संपली असून मुदतवाढीवर गेली काही वर्ष ठेका सुरू आहे. कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक गाड्या जुन्या असून त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र सुद्धा नाही. युवासेनेचे पवन घरत यांनी या बाबत माहिती अधिकारातून सदर प्रकार उघडकीस आणत तक्रारी केल्या आहेत. जेणे करून प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी काही कचरा गाड्यांवर कारवाई सुद्धा केली आहे.
उत्तन येथील डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी जाताना तसेच कचरा टाकून परत येताना आता पर्यंत अनेक कचरा गाडयांना अपघात झालेले आहेत. अनेक चालकांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना देखील नाही. तर अनेकवेळा अपघात करणारे चालक हे मद्यपान करून असल्याचे उघडकीस आल्याचा आरोप स्थानिक स्थानीक नगरसेविका शर्मिला गंडोली सह ग्रामस्थांनी केला आहे.
गुरुवारी सुद्धा डोंगरी - उत्तन मार्गावर भरधाव कचरा गाडीने रस्त्या लगतच्या झाडास जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की झाड मोडून पडले. झाड होते म्हणून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी चालकाला पकडले असता तो मद्यपान केलेला होता. डंपिंगच्या ठिकाणी कचरा टाकण्यास वाहनांची रांग असल्याने हे चालक दारू, सिगारेट आदी व्यसन करत बसतात. या प्रकरणी ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी तक्रार आयुक्तांना केल्याचे नगरसेविका शर्मिला म्हणाल्या. याआधी सुद्धा लेखी तक्रार करून देखील पालिकेने कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.