अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या डॉक्टर्स कॉटर इमारत धोकादायक झाल्याने ती इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी ही इमारत पाडत असताना इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या लॉन्ड्री कक्षावर पडले. या कक्षात कोणीही नसल्याने मोठा अपघात टळला. मात्र स्लॅपचा भाग पडल्याने लॉन्ड्रीचे नुकसान झाले आहे.
पूर्वी अंबरनाथ नगरपालिकेकडे असलेले बीजी छाया रुग्णालयमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी इमारतीच्या शेजारीच चार मजली कॉटर्स बनवण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने ही इमारत धोकादायक अवस्थेत होती. त्यातच बिझी छाया रुग्णालय हे राज्य शासनाकडे वर्ग केल्यानंतर या पडीक इमारतीकडे कोणीही लक्ष देत नव्हते. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने ही इमारत पाडण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. ठेकेदारा मार्फत इमारत पाडकाम सुरू असताना त्या इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या बी जी छाया रुग्णालयाच्या लॉन्ड्रीवर पडला. या अपघातात लॉन्ड्रीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सहा महिन्यांपूर्वीच या लॉन्ड्रीमध्ये अत्याधुनिक यंत्र मागवण्यात आले होते. या यंत्रांचे नुकसान झाल्याने आता बीजी छाया रुग्णालय प्रशासनाने पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराच्या विरोधात तक्रार केली आहे. ज्यावेळेस हा अपघात घडला त्या अपघाताच्या दहा मिनिटाआधीच या लॉन्ड्रीमध्ये काम करणारे कर्मचारी काही कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यामुळे या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. तर दुसरीकडे इमारतीचे पाडकाम करताना सुरक्षेची कोणतेही उपाय योजना न केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप आता नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात पालिकेचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत.