अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली असून या निवडणुकीसाठी जी मतदार यादी घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते ते रद्द केले आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये सुधारित मतदार यादी वापरली जाणार आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात आदेश दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२० पर्यंत जी मतदार यादी तयार करण्यात आली होती, तीच यादी पालिकेच्या निवडणुकीत घेण्याचे आदेश दिले होते. या मतदार यादीनुसार कामही पालिकेने सुरू केले होते. मात्र कोरोनामुळे पालिकेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासकीय राजवट लागू करून सर्वप्रथम धोरणाच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या कामकाजाला स्थगिती देण्यात आली. या स्थगितीला नऊ महिने उलटत असून निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने आता राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात काढलेला आपलाच आदेश रद्द केला आहे. १ जानेवारी २०२० पर्यंतची यादी निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होती. नेमकी कोणती मतदार यादी घ्यावी?निवडणूक आयोगाने दोन्ही पालिकांना १ जानेवारी २०२० ची मतदार यादी न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आगामी निवडणुकीसाठी कोणती मतदार यादी घ्यावी याबाबत कोणतेही निर्देश केलेले नाहीत.
नव्या मतदार यादीनुसार पालिका हाेणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 1:36 AM