ठाणे : कर्जाच्या नावाखाली घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी या गोरखधंद्यासाठी तब्बल २३ बँकांमध्ये खाती उघडल्याची माहिती तपासात उघडकीस आले आहे. त्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे वापरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.घाटकोपर येथील सुरेश डोडिया यांना कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली सुमारे तीन कोटी रुपयांना फसवल्याबद्दल वर्तकनगर पोलीस ठाण्यात १३ आरोपींविरुद्ध ९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये नीरज ग्रोवर हत्याकांडामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेली दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसाईराज हिचाही समावेश आहे. आरोपींमध्ये ठाण्यातील रूस्तमजी सोसायटीची रहिवासी ३२ वर्षीय पारूमती हिचाही समावेश आहे. पारूमती वेगवेगळ्या नावांनी वावरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोर्मिता, परीमिता, पारूमिता चक्रवर्ती, पारूमिता बॅनर्जी आणि अड्रिजा असीम बॅनर्जी अशी वेगवेगळी नावे ती लोकांना सांगायची. काहींना तिने स्वत:चे नाव परीमिता सांगून आपण पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी असल्याची बतावणीही तिने केली.फसवणुकीसाठी तिच्या नावाच्या बँक खात्यांचा वापर आरोपींनी मुख्यत्वे केला. पारूमतीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत असून, आतापर्यंत १३ पैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्री मारिया सुसाईराज हिचा शोध सुरू असून, ती कर्नाटकात शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे.पारूमिता आणि मारियाची तुरुंगात भेट- निर्माता नीरज ग्रोवर हत्याकांडामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने २०११ साली अभिनेत्री मारिया सुसाईराज हिला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या वेळी तिला भायखळा तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते.त्याच दरम्यान आरोपी पारूमिता एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये भायखळा तुरुंगात बंद होती. त्या वेळी दोघींची भेट झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर, त्यांनी फसवणुकीचा धंदा सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.धनादेशावर खोडाखोड : तक्रारदार सुरेश डोडिया यांना आरोपींनी त्यांचे ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून, प्रक्रिया शुल्कापोटी त्यांच्याकडून सुमारे तीन कोटी रुपये घेतले होते. तत्पूर्वी त्यांनी डोडिया यांना त्यांच्या नावाचा ३० कोटी रुपयांचा धनादेश दाखविला होता. प्रत्यक्षात हा धनादेश कमी रकमेचा होता. आरोपींनी त्यावर खाडाखोड करून ३० कोटी रुपयांचा आकडा टाकला होता.
आरोपींची तब्बल २३ बँकांमध्ये खाती, मारिया सुसाईराज कर्नाटकात शूटिंगमध्ये व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:32 AM