कल्याण : मुंबई आणि ठाण्याच्या निवडणूक प्रचारात कल्याण-डोंबिवलीला सहा हजार पाचशे कोटींचे पॅकेज दिल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. पण त्यातील छदामही पालिकेला मिळालेला नाही. मुख्यमंत्री खोटे बोलत असून ते करीत असलेल्या फसवणुकीबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याची टीका कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने विकास परिषद घेतली. त्यात ६ हजार ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्यातील रुपयाही पालिकेला मिळाला नसताना ठाणे, मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचा उल्लेख करीत आहेत. कल्याण- डोंबिवलीच्या जनतेची फसवणूक करणारे मुख्यमंत्री प्रचारात फसवणूक करणारी खोटी आश्वासने देत आहेत. या खोटारड्या मुख्यमंंत्र्यांची तक्रार राज्यपालांकडे करणार असल्याचे देवळेकर यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवलीकर मुख्यमंत्र्यांच्या भूलथापांना फसले. आता ठाणे-मुंबईकरांनी फसू नये, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी तपशील विचारल्यावर पालिकेने एमएमआरडीए व नगरविकास खात्याकडे विचारणा करुन एकही रुपयाही मिळालेला नाही, असे कळवले आहे. असे असूनही मुख्यमंत्री मात्र कल्याण-डोंबिवलीच्या विकासाची खोटी माहिती देत प्रचारात अन्य ठिकाणच्या मतदारांची दिशाभूल करीत आहेत. दिवा दत्तक घेण्याचे आश्वासन देत आहेत. तेथील डम्पिंग ग्राऊंड वर्षात हटवू, असे सांगत असल्याचा आरोप तयंनी केला. २७ गावांसाठी विकास अनुदान म्हणून मागितलेल्या पाच हजार कोटींचाही विचार अद्याप मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना लावण्यात आलेली शास्ती रद्द करण्याची मागणी मान्य न करता ते आता दिव्यातील शास्ती रद्द करण्याची घोषणा करत आहेत. हा न्याय कल्याण-डोंबिवलीकरांना का नाही, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला संत्र्याची शेती प्रसिद्ध आहे. पण ते सर्वत्र आश्वासनांचे गाजर दाखवत आहेत. त्यामुळे सध्या नागपुरात गाजराचे पिक जोमात आल्याची तिरकस टीका देवळेकर यांनी केली.देवळेकर यांनी केलेली टीका हा उद्धव ठाकरे यांचाच वार आहे. पण तो त्यांनी महापौरांच्या आडून केला आहे, अशी टीका आमदार नरेंद्र पवार यांनी केली, तर मनसेचे राजेश कदम यांनी शिवसेनेलाच टीकेचे लक्ष्य करत मुख्यमंत्र्यांना गाजरे देण्याचा अधिकार त्यांना नसल्याचा चिमटा काढला. मॉलच्या दारात ६० बस वापराविना ठेवल्या आहेत, त्यांनी फक्त चांगल्या प्रवासाची गाजरे दाखवली आहेत, त्यांना अशी टीका करण्याचा अधिकार पोचत नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांवर महापौरांचा खोटारडेपणाचा आरोप
By admin | Published: February 14, 2017 2:59 AM