ठाणे : ड्रग्जचे मुंब्रा कनेक्शन शोधून ड्रग्जची विक्री करणाऱ्या सलमान फालकेला मदत करणाºया लोकप्रतिनिधीची चौकशी करुन मुंब्य्रातील तरुण पिढीला बरबाद करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. दुसरीकडे हे आरोप होत असतांना आता शरद पवार गटाने अजित पवार गटाचे प्रदेशचे नेते नजीब मुल्ला यांच्या सोबत असलेला सलमान फालकेचा फोटोच समोर आणत आता याचीही चौकशी करा अशी मागणी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी केली आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंब्र्यामधील सलमान फालखे याचे नाव पुढे आले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे दाखवली आहेत. यात ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण दिसत आहेत, जितेंद्र आव्हाड दिसत आहेत. एकूणच सलमान फालकेला कुठलाही राजाश्रय मिळत असल्याचा पुरावा असेल तर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. सलमान फालकेचे ट्रॅन्झॅक्शन जर शानू पठाण याच्या बरोबर असतील आणि ड्रग्ज तस्करीचा पुरावा पोलिसांकडे असेल आणि याप्रकरणी जर मुंब्रा कनेक्शन असेल, कुठलाही लोकप्रतिनिधी जर सलमान फालकेची मदत केल्याचे दिसत असेल तर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुसरीकडे अजित पवार गटाकडून हे आरोप होत असतांना, नजीब मुल्ला यांच्या सोबत सलमान फालकेचा फोटोच समोर आणत आता यावर सुध्दा कारवाई करा अशी मागणी शहर पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी एनआयचे राबोडीत छापे पडले होते, ते कोणत्या व्यक्तीच्या घरी पडले होते, आणि कोण कोणाच्या आश्रयास गेला होता, हे आम्हालाही माहित आहे. मात्र आम्ही त्याचे राजकारण करत नाही, उगाच आमच्या नादाला लागू नका नाही तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोघांचा फोटोही दाखवत हे दोघे गुंड असून आता मग यावर आम्ही बोलायचे का? असा सवालही त्यांनी केला. तर माझे व्यवहार परांजपे यांना दिसत असतील मी चौकशीला तयार आहे. मात्र नजीब मुल्ला यांचीही चौकशी करा अशी मागणी माझी विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी केली आहे. आमच्या पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचे केवळ डाव आखला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.