मुरबाड : मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मधोमध झाडांची लागवड करण्याच्या नावाखाली तीनचार लाखांचा भ्रष्टाचार केल्याची बाब मनसेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, ही खरेदी बाजारमूल्याप्रमाणे केल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.
मुरबाड-म्हसा रस्त्यावर मधोमध झाडे लावण्याची निविदा गेल्या वर्षी लक्ष्मी गार्डन सर्व्हिस या एजन्सीला देण्यात आली होती. एकूण ७२८ झाडे लावण्यात आली. यामध्ये फॉक्सटेल पाम, झुडूपरोप, पामरोप अशा विविध झाडांचा समावेश करण्यात आला. यासाठी सहा लाख ८० हजार रु पये खर्च झाला. फॉक्सटेल पाम या एका झाडाची किंमत १३०० रुपये दाखवण्यात आली आहे. नर्सरीत मात्र याची किंमत ६०० रुपये आहे. झुडूप झाडाची किंमत ६५२ रु पये दाखवण्यात आली आहे. तीच किंमत नर्सरीत ३०० रुपये इतकी आहे. तर, पामरोपाची किंमत तीन हजार रुपये दाखवण्यात आली आहे. तर, नर्सरीत हे झाड दीड हजारांना मिळते. मनसेचे शहरप्रमुख नरेश देसले यांनी माहिती घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. झाडांची देखभाल व पाणी देण्यासाठीदेखील खर्च करण्यात आला आहे. असे असतानाही आजमितीस केवळ ९० झाडे जिवंत असल्याचे दिसते आहे. याबाबत देसले यांनी मुरबाड उपअभियंत्यांकडे तक्रार केली असून चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. मात्र, शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ यांच्या म्हणण्यानुसार ही खरेदी शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार करण्यात आलेली आहे.