ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला. अक्षय हा फटाके उडवायला घाबरायचा तर तो पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करूच शकत नाही, असा दावा त्याच्या काकांनी केला. अक्षयचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी केली.
नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आरोपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई- वडील सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गेले होते. मुलाला भेटण्याचे टोकन त्यांना मिळाले नव्हते. त्यांना दुपारी ३.३० वाजता येण्यास सांगण्यात आले. साधारण ३.४५ वाजता ते गेल्यानंतर अक्षयची आणि त्याच्या आई- वडिलांची २० मिनिटांसाठी भेट झाली. त्यानंतर अवघ्या दोन तासांनंतर त्याच्या एन्काउंटरची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून समजल्याची माहिती अक्षयच्या चुलत्यांनी दिली.
कारागृहातील भेटीमध्ये माझ्यावरील चार्जशीट दाखल झाली. मला कधी सोडविणार? अशी विचारणा त्याने केली. त्याच्या भेटीनंतर ४.४५ वाजता बाहेर पडल्यानंतर पोलिस चकमकीत तो मारला गेल्याचे समजले. परंतु, पोलिसांनी अधिकृतरीत्या काहीच कळवले नाही. या प्रकरणातील सहाजण फरार आहेत. अक्षयवरील गुन्हा सिद्ध झाला नव्हता. म्हणूनच त्याला मारले, असा आरोप करीत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्याच्या काकांनी केली. माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? असा सवालही त्याच्या आईने केला.
बदलापूरमध्ये वाजले फटाकेअक्षय शिंदे याचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाल्याचे समजल्यावर बदलापूरमध्ये फटाके फोडून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. शिंदेला तातडीने फाशी देण्याची मागणी बदलापूरमधील नागरिकांनी केली होती.