ठाणे : पोलिस चकमकीत आराेपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यामुळे व तोच या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्याने न्यायालयात अबेटेड समरी दाखल करून हे प्रकरण बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील काही बेपत्ता आराेपींचा शाेध घेतला जाणार आहे. ते सापडल्यावर त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र प्रत्यक्ष लैंगिक अत्याचाराच्या घटनेशी त्यांचा संबंध नाही, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
अक्षय शिंदे याच्या चकमकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. आराेपीच्या चेहऱ्यावर न्यायालयात नेताना काळ्या रंगाचा बुरखा हाेता; कारण जमाव प्रक्षाेभक हाेता. काहीजण त्याच्यावर ॲसिड फेकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने ती खबरदारी घेतली होती.
काळा बुरखा नव्हता
सोमवारी तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणताना अक्षयच्या चेहऱ्यावर काळा बुरखा घातला नव्हता. त्याची गरज नव्हती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस कोठडीमध्ये अक्षयला मारहाण झाल्याचा त्याच्या वडिलांचा आराेप पोलिसांनी फेटाळून लावला. बेपत्ता संस्थाचालकांचा गुन्हा तुलनेने गंभीर नाही; त्यामुळे जेव्हा त्यांचा तपास लागेल तेव्हा केवळ त्यांचे जबाब नोंदवले जातील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.