लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अमरावती येथे दरोडा टाकून लाखोंची लूट करणा-या शिवासिंग शिकलगार (३०) याला कल्याणच्या अंबिवली येथून तर मुक्तासिंग जोगनसिंग टाक (३५) याला अंबरनाथ येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अमरावती पोलिसांबरोबर केलेल्या संयुक्त कारवाईत नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून ५९ हजारांच्या रोकडसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अमरावती जिल्हयामध्ये दोन महिन्यांपूर्वी परतवाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अज्ञात दरोडेखोरांनी २० लाखांचा ऐवज लुटला होता. तसेच ८ आॅगस्ट २०१९ रोजी चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३ लाखांचा दरोडा टाकल्याने अमरावतील जिल्हयामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरोडेखोरांची ही टोळी ठाणे परिसरातील अंबिवली येथे लपल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. या टोळीला पकडण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीची मागणी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अमरावती पोलिसांनी केली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे, संदीप बागुल, पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड आणि नरसिंग महापुरे आदींचे पथक पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी तयार केले. याच पथकाच्या मदतीने अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल किनगे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आंबिवली येथून शिवसिंग याला तर अंबरनाथ येथून मुक्तासिंग याला १७ आॅगस्ट रोजी ताब्यात घेतले. अमरावती पोलिसांनी या दरोडेखोरांकडून दरोडयातील १७२ ग्रॅम सोने, ८०० ग्रॅम चांदी तसेच ५९ हजारांची रोकड असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने ठाण्यातील दिवा तसेच ठाणे शहर परिसरातही जबरी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे अमरावती नंतर ठाणे पोलीसही त्यांचा ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमरावती येथे दरोडा टाकून लाखोंची लूट करणाऱ्या शिकलगार टोळीतील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 6:15 PM
अमरावती जिल्हयामध्ये २० लाखांचा आणि ३३ लाखांचा दरोडा टाकून पसार झालेल्या शिकलगार टोळीपैकी शिवासिंग शिकलगार (३०) आणि मुक्तासिंग जोगनसिंग टाक (३५) या दोघांनाही ठाणे परिसरातून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त कारवाईमध्ये नुकतीच अटक केली आहे.
ठळक मुद्दे ५९ हजारांच्या रोकडसह सात लाखांचा मुद्देमाल जप्तठाणे गुन्हे शाखेची कारवाईठाणे परिसरातही केले जबरी चोरीचे गुन्हे