ठाणे : चोरी, घरफोडीसह मोक्काअंतर्गत कारवाई झालेला महेश हेगडे (४०, विक्रोळी, मुंबई) हा गेल्या पाच वर्षांपासून पसार झाला होता. त्याला विक्रोळी भागातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
हेगडे याच्याविरुद्ध ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात घरफोडी, तसेच इतर गंभीर गुन्ह्यांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित कायदा, अर्थातच मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला जामीनही मंजूर झाला होता. त्यानंतर, न्यायालयात हजर न होता, २०१५ पासून तो पसार झाला होता. त्याचा शोध घेण्याचे आदेश ठाणे गुन्हे शाखेच्या पथकास देण्यात आले होते. त्यानुसार, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने विक्रोळी येथील कन्नमवारनगर भागातून त्याला २५ सप्टेंबर रोजी अटक केली.