लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महिलांंच्या गळ्यातील सोनसाखळ्या जबरदस्तीने चोरणा-या मिलिंद सुतार (२४, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या अट्टल चोरट्याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून चार गुन्ह्यांमधील एक लाख ६६ हजारांच्या सहा सोनसाखळ्या हस्तगत केल्या आहेत.ठाण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी सोनसाखळी चोरट्यांना शोधण्याचे आदेश वागळे इस्टेट परिमंडळाच्या सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर मिलिंद सुतार हा संशयित सोनसाखळी चोरटा लोकमान्यनगर भागात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांना मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आव्हाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिवाजी यादव, पोलीस हवालदार संदीप भोसले, कॉन्स्टेबल डी.एस. काटकर, एस.एस. जामगे आणि के.एस. सोनवणे या पथकाने २७ फेब्रुवारी रोजी मिलिंदला लोकमान्यनगर भागातून ताब्यात घेतले. चैतीनगर येथील रहिवासी साक्षी आर्डे (३९) या २६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास एका नातेवाइकाच्या लग्न समारंभाला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या घराजवळच एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून पळ काढला होता. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मिलिंद याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने या चोरीसह आणखी चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. या काळात ४४ हजारांचे ११ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २४ हजारांची सहा ग्रॅमची सोनसाखळी, १० ग्रॅमची ४० हजारांची सोनसाखळी, ४२ हजारांची सोन्याची माळ, पाच ग्रॅमची १० हजारांची सोनसाखळी आणि कानांतील तीन ग्रॅमचे सहा हजारांचे सोन्याचे वेल असा एक लाख ६६ हजारांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केला आहे. त्याने आणखीही कुठे चोरी केली आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे अंबुरे यांनी सांगितले.मॉलची नोकरी सुटल्यानंतर केल्या चो-यामिलिंद हा ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरीला होता. काही किरकोळ कारणावरून त्याला मॉलमधील नोकरीवरून काढले होते. त्यानंतर, त्याने हा जबरी चोरीचा मार्ग पत्करल्याचे चौकशीत पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात महिलांच्या सोनसाखळ्या जबरीने चोरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 9:58 PM
पायी जाणा-या महिलांना निर्जनस्थळी गाठून त्यांच्या गळयातील सोनसाखळया जबरदस्तीने खेचून पलायन करणा-या मिलिंद सुतार (२४, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या अट्टल चोरट्याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार गुन्ह्यांमधील एक लाख ६६ हजारांच्या सहा सोनसाखळ्या हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली.
ठळक मुद्देदीड लाखांचा ऐवज हस्तगतवर्तकनगर पोलिसांची कामगिरी