कल्याण : पश्चिमेतील भारताचार्य वैद्य चौक येथील जानकीदास सेल्टरमध्ये राहणाऱ्या शैलजा कदरकर यांच्या घरात दोघा चोरट्यांनी ५ जुलैच्या दुपारी १.३० च्या सुमारास घुसून सोने, चांदी आणि रोकड असा चार लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. दरम्यान, त्या वेळी शैलजा यांनी दाखविलेले धाडस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत यातील आरोपी राहुल सिल्वराज मुपनार उर्फ राहुल हाल्या दिवा (२९) यास पकडून बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केले. दुसरा पसार झालेला आरोपी प्रकाश उर्फ बुवा सीताराम सोनावणे यालाही जेजुरी येथून अटक केली आहे. चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल तक्रारदार शैलजा यांना सुपुर्द करीत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी धाडसाबद्दल त्यांचा सत्कार केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप यांनी दोन विशेष पथक तयार केली होती. प्रकाश सोनवणे हा सराईत गुन्हेगार असल्याने तो त्याची लपण्याची ठिकाणे सतत बदलत होता. तसेच वारंवार मोबाइल क्रमांक बदलत होता. अखेर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाशला बाजारपेठ पोलिसांनी जेजुरी येथून अटक केली. दरम्यान, प्रकाशला घरात लपवून आसरा देणाऱ्या दीपक कदम यालाही बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
--------------