लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिकेसमोरील रस्त्याने जाणा-या स्रेहा कोलगे (३३, रा. पाचपाखाडी, ठाणे) या महिलेच्या हातातील रोकड असलेली पर्स जबरीने खेचून पलायन करणा-या दक्ष भट (२०, रा. विलेपार्ले, मुंबई) याला नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. त्याला नौपाडा पोनिसांनी अटक केली आहे.बाजारात खरेदीसाठी १० नोव्हेंबर रोजी ही महिला बाहेर पडली होती. ती रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कचराळी तलावाच्या समोरील रस्त्याने जात असतांना तिच्या पाठीमागून दोघेजण मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने तिची रोकड आणि मोबाइल असलेली पर्स असा १५ हजारांचा ऐवज खेचून पळ काढला. अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे प्रचंड भेदरलेल्या स्रेहा हिने आरडाओरडा केला. हा प्रकार तिथे असलेल्या काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या मोटारसायकलवरील दोघांचा पाठलाग केला. नौपाडा पोलिसांचेही पथक या दोघांच्या मागावर असतांनाच त्यांना खोपट परिसरात नागरिकांनी पकडले. त्यांच्यापैकी मोटारसायकलवर बसून बॅग खेचणारा हाती लागल्यानंतर त्याला चांगलाच चोप नागरिकांनी दिला. तोपर्यंत तिथे पोहचलेल्या राबोडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या सर्व धुमश्चक्रीत भटचा दुसरा साथीदार मात्र तिथून मोटारसायकलवरुन निसटला. भटने जबरीने चोरलेली पर्स, १२०० ची रोकड आणि मोबाइल असा १५ हजारांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, भट याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
महिलेची रोकड आणि मोबाइल जबरीने चोरणा-यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले
By जितेंद्र कालेकर | Published: November 11, 2019 10:42 PM
मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी एका महिलेची पर्स जबरीने हिसकावून पळ काढल्यानंतर तिने आरडाओरडा करताच प्रसंगावधान राखून नागरिकांनीही त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यापैकी एकाला नागरिकांनी पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला राबोडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना रविवारी रात्री घडली.
ठळक मुद्दे पर्स हिसकावल्यानंतर नागरिकांनी केला पाठलागपोलिसांचेही गस्ती पथकही होते मागावरराबोडी पोलिसांनी घेतले ताब्यात