अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवसेनेने गुन्हेगारांना पायघड्या घातल्याचे पाहायला मिळत आहे. रिपाइं नेते नरेश गायकवाड यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरून शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि आ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या प्रवेशावरून नरेश गायकवाड यांचे पुत्र कबीर गायकवाड यांनी संताप व्यक्त केला असून शिवसेना गुन्हेगारांना वाव देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अंबरनाथमधील रिपाइंचे नेते नरेश गायकवाड यांची २००२ मध्ये अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात धारदार शस्त्रांनी वार करून आणि गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी पापा सय्यद आणि इंदिन सय्यद यांच्यासह अन्य काही जणांना अटक झाली होती. न्यायालयात त्यांच्यावर हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यातील पापा सय्यद यांना शासनाने शिक्षेतून मुक्त केले. त्यांच्यासह आरोपी असलेले इंदिन सय्यद, फिरोज पठाण, अनवर पठाण हे आरोपी पॅरोलवर अंबरनाथ शहरात आले आहेत. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांसोबत जवळीक साधण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि आ. बालाजी किणीकर यांनी या गुन्हेगारांना सेनेत प्रवेश दिला. या पक्षप्रवेशाबाबत नरेश गायकवाड यांचे पुत्र कबीर गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हत्येसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिवसेना मतांच्या राजकारणासाठी प्रवेश देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
----
निर्णय वरिष्ठांचा - किणीकर
पक्षप्रवेशासंदर्भात कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. तर या पक्षप्रवेशाबाबत आ. बालाजी किणीकर यांना विचारले असता हा निर्णय वरिष्ठांचा असून मी केवळ पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होतो, असे स्पष्ट केले.
---------------
फोटो आहे