भिवंडी: शहरातील कामतघर वऱ्हाळदेवी नगर परिसरातील १६ वर्षीय संकेत भोसले या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे मंगळवारी सायंकाळी आठवले यांनी पीडित भोसले परिवाराला भेट दिली यावेळी ते बोलत होते.
मयत संकेत भोसले हत्ते प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून ५ आरोपी फरार असून पोलीस या फरार आरोपींचा देखील लवकरात लवकर शोध घेणार असून तशा सूचना देखील आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पीडित भोसले परिवाराला समाज कल्याण विभागाच्या वतीने सव्वा आठ लाख रुपयांचा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून संपूर्ण आरपीआय पार्टी पीडित कुटुंबा सोबत असल्याची ग्वाही देखील यावेळी आठवले यांनी दिली.
तर या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिसांचा हलगर्जीपणा झाला असून याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आठवले यांनी केली.यावेळी आरपीआय गटाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्यासह आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते व वऱ्हाळदेवी नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.