ठाणे: कळवा येथील एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला विश्वनाथ यादव हा कोल्हापूर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो अभिवचन रजेवर (पेरोल) कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून फरार झाला होता. त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने पुन्हा अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शुक्रवारी दिली.ठाण्याच्या कळवा येथील गोपाळराव नगर झोपडपट्टी येथे २ आॅक्टोंबर २००८ रोजी बबन रंगनाथ शिंदे याचा खून झाला होता. या खून प्रकरणात विश्वनाथ यादव याला कळवा पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती. त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याला २६ एप्रिल २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर त्याची कोल्हापूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. ही शिक्षा भोगत असतांना कारागृह प्रशासनाकडून अभिवचन रजा मिळवून तो बाहेर आला होता. तिथून बाहेर पडतांना नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी असा पत्ता त्याने कारागृह प्रशासनाकडे नोंदविला होता. रजा संपवून ९ एप्रिल २०१३ रोजी कोल्हापूरच्या कारागृहात तो हजर होणे अपेक्षित असतांना तो पसार झाला होता. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात कोल्हापूर मध्यवर्ती तुरु ंग प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांपासून तो पोलीस आणि कारागृह पोलिसांना हुलकावणी देत होता. यादव आपली ओळख लपवून गुजरात राज्यात वास्तव्य करीत असल्याची माहिती असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागूल, अविराज कुºहाडे, समीर अहिरराव, हवालदार आनंदा भिलारे आणि संभाजी मोरे आदींच्या पथकाने अलंग, ता. तलाजा, जिल्हा भावनगर (गुजरात राज्यातून) युनिट एकच्या पथकाने त्याला ३ जानेवारी २०१९ रोजी अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी त्याला रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचेही देवराज यांनी सांगितले.
अभिवचन रजेच्या आधारे कोल्हापूर कारागृहातून पसार झालेला खूनातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 6:42 PM
कोल्हापूर कारागृहातून अभिवचन रजेवर (पेरोल) पसार झालेला जन्मठेपेतील आरोपी विश्वनाथ यादव याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पाच वर्षांनंतर मोठया कौशल्याने गुजरातमधून जेरबंद केले आहे.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईखून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षापाच वर्षांपासून होता पसार