कल्याण : झारखंडमधील दुमका जिल्ह्यात सहा वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मुंबईच्या दिशेने पळालेल्या आरोपीला महात्मा फुले चौक पोलिसांनी ८ फेब्रुवारीला तत्परता दाखवत अवघ्या २० मिनिटांत ताब्यात घेतले होते. त्यानंतर, दुमका पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या त्या तिघांना दुमका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.दुमका जिल्ह्यातील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या एका नातेवाइकाने आपल्या दोन मित्रांसोबत सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतर हत्या करत तिचा मृतदेह पुरला. ७ फेब्रुवारीला चिमुकलीचा मृतदेह हाती लागताच पोलिसांनी तपास सुरू केला. त्याचदरम्यान, मुख्य आरोपी मिठू राय (२३) पोलिसांच्या हातातून निसटला. तो मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती दुमका पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे मिळाली. ही बाब दुमकाचे पोलीस अधीक्षक वाय.एस. रमेश यांनी कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना कळवली. तसेच, मिठू प्रवास करत असलेली रेल्वे २० मिनिटांत कल्याण रेल्वेस्थानकावर पोहोचणार असल्याचेही सांगितले.पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने कल्याण स्थानक गाठून मिळालेल्या फोटोच्या आधारे मिठूला ताब्यात घेतले. पंकज मोहाली आणि अशोक राय या दोघांसह आपण हे कृत्य केल्याची कबुली मिठूने चौकशीदरम्यान दिली. महात्मा फुले चौक पोलिसांनी मिठूला दुमका पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेच्या २४ दिवसांत या प्रकरणाची सुनावणी करून दुमका न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.अवघ्या २४ दिवसांत जलदगती न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
हत्येतील आरोपींना झारखंडमध्ये फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:30 AM