ठाणे: साडे चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पांडुरंग सुदाम शेलार (४४, रा. म्हातार्डी, जि. ठाणे) या आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश देशमुख यांनी बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास त्याला तीन महिने साध्या कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार आहे.
ठाण्यातील म्हातार्डी परिसरात राहणारी ही अल्पवयीन पिडित मुलगी ८ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग शेलार याच्याकडे खेळण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने मुलीच्या आईने तिची शोधाशोध केली. त्यावेळी तिच्यावर शेलार याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार निदर्शनास आला. या प्रकाराची कुठेही वाच्यता करायची नाही, असे सांगत शेलार याने या पिडितेला दहा रुपयांचे अमिषही दाखविले होते. त्यानंतर याप्रकरणी मुलीच्या पालकांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी शेलार याला १० जानेवारी २०२१ रोजी अटक केली होती.
याच खटल्याची सुनावणी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे न्यायालयात झाली. यामध्ये तपासी अधिकारी म्हणून कळवा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनिल घाेसाळकर यांनी काम पाहिले. सरकारी वकील म्हणून संध्या म्हात्रे तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार विद्यासागर कोळी यांनी काम पाहिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, संजय दवणे यांच्यासह तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शहाजी शेळके, उपनिरीक्षक दीपक घुगे, हवालदार देवेंद्र पवार आणि सुचिता देसाई आदींनी कामगिरी केली. पिडितेसह सहा साक्षीदारांची साक्ष पडताळण्यात आली. सर्व साक्षी पुरावे पडताळून बलात्कारासह पोक्सो तसेच शेडयूल कास्ट कायद्याप्रमाणे दोषी ठरवून आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.