लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तिहेरी हत्यांकांडामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना बिहारच्या जेलमधून दोन वेळा पसार झालेल्या कुख्यात प्रजितकुमार सिंह (४०, रा. इंद्रागाछी, जि. चंम्पारण, बिहार) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. त्याला ठाण्यातील नौपाडा भागातील बी केबिन परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रजितकुमार हा ठाण्याच्या नौपाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सापळा लावून त्याला २६ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याचे वास्तव्य मुंबई आणि ठाणे परिसरात असल्याची माहिती बिहार येथील पश्चिम चंपारण, बेतिया येथील पोलीस अधीक्षकांकडून २५ मार्च २०२० रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. त्याला यापूर्वीही डिसेंबर २०१८ मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली होती. त्याने १८ एप्रिल १९९८ रोजी एकाच कुटूंबातील तिघांना जागीच ठार केले होते. याच तिहेरी हत्याकांडाबद्दल त्याला न्यायालयाने अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला २७ जानेवारी २०२० रोजी बिहारच्या बेतिया न्यायालयात सुनावणीसाठी नेले जात असतांना त्याने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले होले. त्याला लवकरच बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली........................................२५ हजारांचे होते बक्षीसप्रजितकुमार हा बिहारच्या बक्सर कारागृहात शिक्षा भोगत असतांना काही वर्षांपूर्वी त्याच्या दोन भावांचा अपघातात मृत्यू झाला. हा प्रकार त्याच्या जुन्या शत्रूंनी केल्याचा गैरसमज करून त्याने बक्सरच्या तुरु ंगातून इतर चार आरोपींसह पलायन केले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध ३१ डिसेंबर २०१६ रोजी बक्सर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या काळात त्याने भोसकलेल्या कुटूंबियांकडून १० लाखांची खंडणी त्याने मागितली. खंडणीप्रकरणी त्याच्याविरुद्ध १४ नोव्हेंबर २०१८ रोजी कालीबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नेपाळ, दिल्ली, कलकत्ता, गुजरात, नाशिक आणि मुंबई असा प्रवास करीत ठाण्यात येऊन पोहचलेल्या सिंगला गुन्हे शाखेच्या युनिट एकने डिसेंबर २०१८ मध्ये अटक केली होती. आताही त्याच्यावर बिहारच्या पोलीस महासंचालकांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले असतांना सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी, वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अविराज कुराडे, संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, जमादार उदय देसाई, पोलीस हवालदार नरसिंग महापुरे, अबुतालीब शेख, शिवाजी गायकवाड, आनंदा भिलारे, पोलीस नाईक चंद्रकांत वाळूंज, विक्रांत कांबळे, रिझवान सैय्यद, अमोल देसाई, राहूल पवार आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने त्याला पुन्हा २६ मार्च रोजी अटक केली.