अंबरनाथ: गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी अंबरनाथच्या नेताजी मार्केट मैदानावर रामदास आठवले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान स्टेजवरून खाली उतरत असताना रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्या प्रवीण गोसावी याला उपस्थितांनी जबर चोप दिला होता. वातावरण तापलेले असल्याने रामदास आठवले यांच्या धक्काबुक्की प्रकरणी आणि मारहाण प्रकरणी गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला दहा महिने उलटले असताना गोसावी यांनी आयोजक अजय जाधव आणि सुमित भवार यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सुमेध भवार हे सध्या मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवीत आहेत.
अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरुण चेहरा म्हणून सुमेध भवार यांना पुढे करण्यात आले होते. भवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. त्यातील एका कार्यक्रमात रामदास आठवले यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. नेताजी मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन 8 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन केल्यावर आठवले हे आपल्या कार्यकर्त्यांसह खाली उतरत असताना प्रविण गोसावी नावाच्या अंबरनाथ मधील एका तरुणाने पुष्पगुच्छ देण्याच्या बहाने रामदास आठवले यांच्या कानशिलात वाजवली होती.
हा प्रकार घडल्यानंतर गोसावी यांना जबर मारहाण कार्यकर्त्यांनी केले . घडलेल्या प्रकारानंतर रामदास आठवले यांना मारहाण केल्याप्रकरणी गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घडलेल्या प्रकारानंतर गोसावी याला झालेल्या जबर मारहाणी प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर दहा महिन्यानंतर गोसावी यांच्या फिर्यादीवरून अजय जाधव आणि सुमेध भवार यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवर हे सध्या भाजपा सोडून मनसेत दाखल झाले असून त्यांना मनसेतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते रामदास आठवले यांना भेटण्यासाठी जात असताना अजय जाधव यांनी त्यांना मारहाण करीत जबर जखमी केले तर त्याच वेळेस सुमेध भवार यांनीदेखील गोसावी याला दगडाने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच मारहाण प्रकरणी जाधव आणि भवार यांच्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.