प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : २८ वर्षांच्या युवकास अल्पवयीन मुलासोबत संगनमत करुन जीवे मारणाऱ्या जयेश उर्फ द्वारकादास सोपान गावंड याला शुक्रवारी भा. द. वि. ३०२,२०१ प्रमाणे दोषी ठरवून आरोपीस दोन हजरा रुपयांचा दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ठाणे पुर्व भागात ही घटना घडली होती. कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गावंडच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
मिसिंग इसम नामे सचिन उर्फ बांग्या राईसिंग नरवाडे वय २८ वर्षे या युवकाला अटक आरोपी गावंड व बालगुन्हेगार यांनी आपसात संगमत करून कोपरी येथील राजनगर झोपडपट्टीच्या मागे असणाऱ्या खाडीच्या जागेत, श्री स्वामी समर्थ मठाच्या मागे असणारे खाडीकिनारी नेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड मारून त्यास बेशुद्ध केले. बेशुद्ध झाल्यावर या इसमाचा या दोघांनी कटकारस्थान रचून त्याचा खून केला नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत खाडी मधील चिखलात गाडून टाकले. २०१७ साली ही घटना घडली होती. त्याविरोधात कोपरी पोलीस स्टेशनमध्ये भादवि ३६४,३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. न. सिरसीकर यांच्या कोर्टाने शुक्रवारी जन्मठेपेची शुक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून संजय मोरे व रश्मी क्षीरसागर यांनी फिर्यादाची बाजू मांडली. तर या केसचा तपास पोलीस निरीक्षक एम. डी. जाधव यांनी तर कोर्ट अंमलदार म्हणून पोलीस हवालदार विजय सानप व मपोशि सुशिला डोके यांनी काम पाहिले.