- जान्हवी मोर्ये ।डोंबिवली : वाचनसंस्कृती लोप पावत असल्याचा सूर साहित्य संमेलनापासून मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांपर्यंत अनेक व्यासपीठावरून निघत असला, तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘प्रल्हाद केशव अत्रे ग्रंथालय’ गणेश मंदिर संस्थानला चालवण्यास दिल्याची वर्षपूर्ती झाली, तेव्हा या नवीन सुसज्ज इमारतीमधील ग्रंथालयातील वाचकांची संख्या ६०० ने वाढल्याची सुखद बातमी आहे.ग्रंथालयातील पुस्तके व वाचकसंख्या वाढवण्याचा मानस संस्थानने डोळ्यांसमोर ठेवला आहे. या वाढत्या वाचक आणि पुस्तक संख्येविषयी साहित्य वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.अत्रे ग्रंथालयाची इमारत धोकादायक झाल्याने तिचे काम सुरू असताना ते स्टेशन परिसरात हलवण्यात आले. ही जागा अपुरी व सुसज्ज नव्हती. ७ एप्रिल २०१६ ला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे ग्रंथालय टिळकरोडवरील जागेत सुरू झाले. महापालिकेने ३० वर्षांच्या कराराने हे ग्रंथालय गणेश मंदिर संस्थानला चालवण्यास दिले आहे. दर १० वर्षांनी कराराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ग्रंथालयात सुरू असलेल्या मासिक विभागात ५५० वाचक होते. वर्षभरात या संख्येत १०० ने वाढ झाली आहे. कथा, कादंबरी, कविता या वाचकांच्या संख्येत ४०० ने वाढ झाली आहे. या वाचकांची संख्या तीन हजार २०० वरून ३६०० इतकी झाली आहे. त्यामुळे ग्रंथालयातील एकूण वाचकांची संख्या चार हजारांवर पोहोचली आहे. ग्रंथालयात वाचक संख्या वाढावी, यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. ग्रंथालयात नवीन व वाचकांच्या आवडीनुसार साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी दरमहिन्याला पुस्तकांच्या संख्येत भर टाकली जाते. नवीन साहित्य आणि अनुवादित साहित्य वाचकांना अधिक भावते. दरमहिन्याला किती पुस्तके विकत घ्यायची, हे बाजारात नवीन येणाºया पुस्तकांनुसार ठरवले जाते. ग्रंथालयात आधी ४० हजार पुस्तके उपलब्ध होती. त्यात गणेश मंदिरातील धार्मिक ग्रंथालयातील २२०० पुस्तकांची भर टाकण्यात आली. यामध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषावरील पुस्तकांचा समावेश आहे. बाजारात नवीन उपलब्ध पुस्तके विकत घेतल्याने आज ४३ हजारांच्या आसपास ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. वर्षाला किमान ६० हजार नवीन पुस्तके घेण्याचा संस्थानचा मानस असल्याची माहिती संस्थानचे पदाधिकारी प्रवीण दुधे यांनी दिली.दुधे यांनी सांगितले की, ग्रंथालयात महिन्याला ६५० मासिके येतात. ती तीन महिने ठेवली जातात. त्यामुळे वाचकांना १८०० मासिके एकाच वेळी हाताळता येतात. पुस्तकांसाठी सभासद नोंदणी करताना दोन विभाग केले आहेत. त्यामध्ये एका विभागात एक पुस्तक घेऊन जाणारे वाचक आहेत. तर, दुसºया विभागात दोन पुस्तके एक सभासद एकावेळी घेऊन जाऊ शकतो. पुस्तक वाचून झाल्यावर ते परत करायची मुदत १५ दिवसांची आहे. ग्रंथासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.बालवाचकांसाठी सोयग्रंथालयात असलेल्या बालविभागाची सभासद संख्या ८५ आहे. बालविभागात इंग्रजी पुस्तकांचा ट्रेण्ड अधिक आहे. या सभासदांसाठी दीड ते दोन हजार पुस्तके आहेत. मोफत वृत्तपत्र वाचनालयात जवळपास ४५ वृत्तपत्रे मोफत उपलब्ध करून दिली जातात. या ठिकाणी ६० वाचक बसून वृत्तपत्रे, पुस्तके वाचू शकतात, अशी सोय आहे.अंधांसाठी विशेष सुविधा : ठाणे, मुंब्रा, नवी मुंबई येथील अंध विद्यार्थ्यांसाठी आॅडिओ लायब्ररी सुरू केली आहे. या लायब्ररीच्या परिसरातील १६३ वाचक लाभ घेत आहेत. या लायब्ररीत पहिली ते एमएपर्यंतच्या अभ्यासक्रमाची पुस्तके स्कॅन करून सीडी किंवा पेन ड्राइव्हमध्ये दिली जातात. तसेच कथा-कादंबरी, लेख वाचण्याची इच्छा असलेल्या वाचकाला ते सीडीत उपलब्ध करून दिले जाते. बीकॉम विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर आणि ज्येष्ठांसाठी अॅडव्हान्स इंटरनेट हे प्रशिक्षण दिले जाते.
आचार्य अत्रे ग्रंथालय: डोंबिवलीमध्ये वर्षभरात वाढले ६०० वाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 5:47 AM