प्रशांत माने कल्याण : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेल्या शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या मुख्य कामाला अजूनही प्रारंभ झालेला नाही. यासंदर्भात आजपर्यंत प्रतिसादाअभावी निविदा प्रक्रियाच पार पडलेली नाही. त्यामुळे कामाला मुहूर्त मिळालेला नाही. आता येथील कामांची विभागणी करून त्याप्रमाणे निविदा मागविल्या जाणार आहेत. निविदा प्रक्रियेला लागणारा कालावधी, त्यानंतर काम सुरू होऊन ते पूर्ण व्हायला लागणारा वेळ पाहता हे नाट्यगृह एप्रिल २०१८ मध्येच चालू होण्याची दाट शक्यता आहे.आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहाची स्थिती आलबेल नसल्याने तसेच डागडुजी करण्यासाठी या रंगमंदिराचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्चचा मुहूर्त हुकल्यानंतर या दुरुस्तीच्या कामासाठी हे रंगमंदिर एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे १ एप्रिलपासून नाट्यगृह बंद करण्यात आले. मात्र, मुख्य कामांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही बंदची डेडलाइन सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. १ आॅक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, ही डेडलाइनही हुकली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेने पहिल्यांदा निविदा काढली तेव्हा तिला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुसºयांदा आणि तिसºयांदा निविदा जारी कराव्या लागल्या. तिसºया वेळेस प्रतिसाद मिळाला, परंतु एकानेच प्रतिसाद दिलेली निविदा ही जादा दराची होती. त्यामुळे ती नाकारण्यात आली. यात चौथ्यांदा काढलेली निविदा ही ४० टक्के जादा दराने आली. त्यामुळे ती देखील नामंजूर करण्यात आली.निविदेला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने आता नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाचे तीन भाग करण्यात आले. त्याप्रमाणे प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा मागविली जाणार आहे. परंतु, या प्रक्रियेलाही विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कामाला जानेवारीपर्यंत सुरुवात होईल आणि या कामासाठी साधारण दोन ते तीन महिने लागणार असल्याने हे नाट्यगृह सुरू होण्यास एप्रिल उजाडेल, असे बोलले जाते आहे.वातानुकूलन यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून, आॅडिटोरीयम (मुख्य प्रेक्षागृह) आणि प्रसाधनगृहांची कामे यांना सुरुवात झालेली नाही. ही कामे नव्या निविदांतून केली जाणार आहेत.डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात कल्याण गायन समाजातर्फे देवगंधर्व महोत्सव भरवला जातो. याच महिन्यात इंडियन मेडिकल असोसिएशनचाही कार्यक्रम होतो. परंतु, आचार्य अत्रे रंगमंदिर सुरू होण्याबाबतची अनिश्चितता पाहता हे दोन्ही कार्यक्रम या वर्षी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात होणार आहेत.दरम्यान, आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीला अद्यापपर्यंत सुरुवात न झाल्याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.जीएसटीचा बसला फटकाकेडीएमसीने नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी चार वेळा निविदा काढली. परंतु, दोन निविदांना प्रतिसाद मिळाला नाही.तिसºया आणि त्यानंतर चौथ्यांदा काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला खरा. पंरतु, त्या निविदा जादा दराने आल्याने त्या नाकारण्यात आल्या आहेत.या एकंदरीतच प्रक्रियेला जीएसटीचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
आचार्य अत्रे रंगमंदिराचा पडदा एप्रिलमध्ये उघडणार ?, कामांची विभागणी करून निविदा मागवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:22 AM