स्नेहा पावसकर
ठाणे : प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना मनासारखे शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून घर सोडून मुंबई गाठली, पण येथेही कोणाचा भक्कम आधार न मिळाल्याने ते पुन्हा गावाकडे वळले. मात्र आपल्याप्रमाणेच घर सोडून मुंबईत विविध कारणांनी येणाऱ्या निराधार मुलांचे काय होत असेल, आपल्यासारखे त्यांचे हाल होऊ नये हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता होता आणि त्यातूनच आपणच त्यांचा आधार व्हायचे ठरवले. विविध संस्थांसोबत काम करून शिकले आणि ज्यांनी समतोल फाउंडेशनची स्थापना केली ती व्यक्ती म्हणजे विजय जाधव. आज घर सोडून पळालेल्या आणि रेल्वेस्थानकावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनाचे संपूर्ण कार्य विजय आणि त्यांच्या पत्नी गीता हे समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून करतात.
ठाण्यातील समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाधव यांची ही गोष्ट. घरची परिस्थिती अगदी हलाखीची. मात्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना चौथीची स्कॉलरशिप मिळाली. आणि त्याच आधारावर त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. जुन्नर येथील गावातून मुंबईत नोकरीसाठी आले. काहीकाळ उमेदी केली. पण कोणाचा भक्कम आधार मिळत नव्हता. अखेर पुन्हा गावी जाऊन त्यांनी निराधार, हरवलेल्या मुलांसाठी काम करायचे ठरवले आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. स्वत: मागास समाजातील असल्याने घरात तसे समाजसेवेचे काम करण्याबाबत पोषक वातावरण नव्हते. मात्र त्यांनी घरच्यांचा विराेध पत्करत हे काम सुरू ठेवले.
दरम्यानच्या काळात गीता यांच्यासोबत विजय यांचे लग्न झाले. विजय हे स्टेशनवर हरवलेल्या मुलांसाठी देणगी किंवा मदत मागून सुरुवातीला काम करायचे. ते गीता यांच्या घरच्यांना पटत नव्हते. विजय यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवसही भीक मागणाऱ्या १०० मुलांसोबत साजरा केला. हा सगळा प्रकार गीता यांच्या माहेरच्यांना वेगळा वाटायचा. ते गीता यांना काही काळासाठी माहेरी घेऊन गेले. मात्र तरीही विजय यांचे समाजसेवेचे कार्य अविरत सुरू होते. कालांतराने त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्कार मिळू लागले तेव्हा गीता यांच्या माहेरच्या मंडळींनाही या कामाचा हेवा, कौतुक वाटू लागले आणि गीता या पुन्हा विजय यांच्यासोबतीने काम करू लागल्या. आज समतोल फाउंडेशनच्या कार्यात गीता या विजय यांच्याही पुढे असतात. हरवलेल्या मुलांचे पुनर्वसन होईपर्यंत व्हॉलंटिअर्सच्या साथीने गीता या मुलांचा आईप्रमाणेच सांभाळ करतात.
-------