लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गटारीनिमित्त पार्टी करून परतणाऱ्या १४१ मद्यपी दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वेगवेगळ्या युनिटने कारवाई करून त्यांच्याकडून अवघ्या एका दिवसात एक लाख ६७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.गटारीच्या दिवशी दारू पिऊन धांगडधिंगा करणे, मुलींची छेड काढणे किंवा दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवणे, असे गैरप्रकार करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने शनिवार, २२ जुलैपासून संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात नाकाबंदी केली होती. रविवार, २३ जुलै रोजी वाहतूक शाखेच्या ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांतील १८ युनिटच्या २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १४१ मद्यपी दुचाकीस्वारांवर कारवाई केली. कल्याणचा सुभाष चौक, वल्लीपीर चौक, दुर्गाडीनाका तसेच ठाण्यातील उपवन परिसर, तीनहातनाका, कॅडबरी, नितीन कंपनीनाका आणि माजिवडा तसेच बाळकुमनाका, कळवा, मुंब्रा, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली आदी परिसरांमध्ये १८ युनिटच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या पथकांनी संशयित मद्यपींची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी केली.
गटारीच्या दिवशी १४१ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:25 PM