उल्हासनगर : शहरातील अतिधोकादायक इमारती कोसळून आर्थिक व जीवितहानी होऊ नये यासाठी महापालिकेने २३ अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला असून इमारतींची यादी जाहीर केली आहे. या इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात राहण्यासाठी आम्ही कुठे जायचे, असा प्रश्न येथील रहिवाशांनी विचारला आहे. दरम्यान, चार इमारतींवर याआधीच पालिकेने कारवाई सुरू केली असून, एक इमारत जमीनदोस्त केल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या २३ पैकी पेनुसुल्ला इमारतीत १०० पेक्षा जास्त दुकाने व कार्यालये आहेत. मिनिस्टर कॉम्प्लेक्समध्ये ६० पेक्षा जास्त दुकाने, घरे आहेत. इतर काही इमारतींमध्येही नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पर्यायी घरे व जागा नसल्याने जाणार कुठे, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ज्या इमारतींमध्ये दुकाने, कारखाने व रहिवासी आहेत, त्यांनाही घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली असून अशा इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिंपी यांनी दिली.भिवंडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाईभिवंडीत धोकादायक इमारत कोसळून ४१ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा धसका सर्वच महानगरपालिकांनी घेतला असून, या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.भिवंडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेनेही शहरातील अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या तातडीने जमीनदोस्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.