मीरारोड - मीरारोड मधील कांदळवन क्षेत्रात भराव करणाऱ्या 3 डंपरवर महसूल विभागाच्या तलाठ्याने कारवाई केली आहे. सुमारे 62 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
मीरारोडच्या हटकेश भागातील पालिका पाण्याची टाकी व नेमिनाथ हाईट्स मागे मोठ्या प्रमाणात कांदळवन, सीआरझेड क्षेत्रात बेकायदा माती भराव झालेला आहे. या प्रकरणात काही गुन्हे सुद्धा महसूल विभागाने दाखल केले आहेत. भराव करून कच्ची व पक्की बांधकामे केली जात आहेत. परंतु अद्यापही सदर भराव काढून पूर्वस्थिती निर्माण करण्यास तसेच कांदळवन वन विभागा कडे हस्तांतरित करण्यास शासनाची चालढकल सुरु आहे. पालिका सुद्धा ठोस कारवाई करत नाही.
दिवस रात्र या भागात बेकायदा माती व डेब्रिस चा भराव सुरु असताना महापालिका व स्थानिक पोलीस मात्र स्वतःहून कारवाई न करता पर्यावरण ऱ्हासाला खतपाणी घालत आहेत. पालिकेची तर माती भराव पथकं असूनही कारवाई होत नाही. तर अपुरं मनुष्यबळ असताना महसूल विभागा कडून तक्रार आल्यास कारवाई केली जाते.
सदर ठिकाणी माती भराव सुरु असल्याची तक्रार मिळताच तलाठी अभिजित बोडके यांनी वरिष्ठांच्या आदेशा नुसार पोलिसांच्या सहकार्याने घटना स्थळावर भराव करताना तीन डंपर पकडले. यावेळी एक जेसीबी सुद्धा आढळला. डंपर चालका कडून सुमारे 62 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. शिवाय कांदळवनात भराव केल्याप्रकरणी पंचनामा तयार करून गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आल्याचे बोडके यांनी सांगितले.
या कारवाईमुळे महापालिकेचे पितळ उघडे पडले असून पालिका आयुक्तांपासून अधिकाऱ्यांना येथे चालत असलेल्या भरावाची कल्पना असताना देखील कारवाई केली गेली नाही.