ठाणे : ठाणे जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांविरोधातील मोहिमेत असे ३६ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. यापैकी ३० डॉक्टरांवर गुन्हेही दाखल केले असून बोगस ३६ डॉक्टरांपैकी निम्मे डॉक्टर हे एकाच मुरबाड या तालुक्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाण्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्येही बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात मुंब्रा येथे बोगस डॉक्टरांच्या चुकीमुळे एका रु ग्णाचा मृत्यू झाला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड,अंबरनाथ,कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची कमिटी तयार केली. त्यानंतर, त्यांच्याद्वारे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत असते. त्यानुसार, आतापर्यंत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३६ बोगस डॉक्टर आढळून आले आहे. त्यापैकी सहा बोगस डॉक्टर कारवाईच्या भीतीने व्यवसाय बंद करून निघून गेले आहेत. ३० डॉक्टरांवर गुन्हे दाखल केलेअसून त्यांची ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
यामध्ये मुरबाड १८, भिवंडीत १६ तर शहापूर, अंबरनाथ येथे प्रत्येकी एकेक बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यातील भिवंडी येथील पाच तर अंबरनाथमधील एका बोगस डॉक्टरने आपला थाटलेला कारभार बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्याला ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला जातो, तसेच ग्रामपंचायत सदस्यांकडूनदेखील बोगस डॉक्टरांची माहिती घेतली जाते. या माहितीच्या आधारे आढळून येणाºया बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३६ डॉक्टर्स आढळून आले आहेत.- डॉ. मनीष रेघे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे