लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेने अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवरील आपली कारवाई तीव्र केली असून, गुरुवारी १२० किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करतानाच १० ते १२ हातगाड्या जप्त केल्या. ठाणे स्थानक, मार्केट, नौपाडा कोपरी या भागातील फेरीवाल्यांवर ही कारवाई केली गेली. वरच्यावर होत असलेल्या कारवाईमुळे ठाण्यातील अनेक रस्ते सध्या मोकळे असून, पादचाऱ्यांना मोठा दिलासा लाभला आहे.
फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्यामुळे चालताना नागरिकांना होत असलेला त्रास थांबविण्याकरिता धडक कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्यानंतर, गुरुवारी ठाणे व कळवा परिसरातील दुकानांसमोरील पदपथ अडवून विक्री करणारे फेरीवाले, हातगाड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ठाणे शहरात सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते ११ या दोन सत्रात कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे स्थानक, मार्केट व नौपाडा कोपरी परिसरात मुख्यत्वे कारवाई करण्यात आली. ठाणे मार्केट परिसरात १० ते १२ हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर मार्केट परिसरात दुकानांसमोरील पदपथावर बेशिस्त पथारी पसरून विक्री करणाऱ्या १२० किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी सॅटिस, मार्केट व नौपाडा-कोपरी परिसरातील पदपथावरील अतिक्रमणे हटवून, हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला. कारवाईच्या वेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे उपस्थित होते.
...........
कळवा परिसरातही कारवाई
कळवा प्रभाग समितींतर्गत कळवा नाका, कळवा बाजारपेठ, कळवा पूर्व, विटावा, आत्माराम पाटील चौक, खारीगांव मार्केट परिसर, ९० फूट रोड या परिसरात कारवाई करण्यात आली. १८ हातगाडी विक्रेते तर दुकानासमोर पदपथावर विक्री करणाऱ्या ४५ विक्रेत्यांवर कारवाई केली. दोन्ही ठिकाणची कारवाई ही सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने केली.
............
वाचली