कल्याण : दररोज ९०० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळत असतानाच दुसरीकडे मास्क न वापरणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. गेल्या दहा दिवसांत केडीएमसीने केलेल्या कारवाईत विनामास्क फिरणाऱ्या ७९१ जणांकडून तीन लाख ९५ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, बुधवारपर्यंत आढावा घेता गेल्या तीन दिवसांत प्रतिदिन अनुक्रमे ६८६, ७११ आणि ८८१ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरू असताना त्याचे गांभीर्य नागरिकांना राहिले नसल्याचे कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरोधात मनपाच्या सुरू असलेल्या कारवाईत १५ ते २४ मार्च या कालावधीत ७९१ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.
------------